वसंताच्या आगमनानं चैत्रपालवी मोहरली. त्याचं येणं तिला नवीन नव्हतं, अनपेक्षित तर मुळीच नाही. तरीही दर वेळी त्याच्या आगमनाची वर्दी देणारं कोकीळकूजन ऐकलं, की ती अंतर्बाह्य थरारून जात असे. त्याच्या स्वागतासाठी मग ती तिचा सर्वोत्तम साज लेवून तयार राहत असे... जणू तिच्या शृंगारपाशात अडकून वसंत कायमचा तिच्याजवळ थांबणार होता! तसं होणं नाही, हे मात्र तिला पुरेपूर माहीत होतं. दोन महिन्यांचा तो पाहुणा - आंबेमोहोराचा पाहुणचार झोडून तो परतीला निघे, त्यानंतर होताच विरहाचा ग्रीष्म तनमन जाळायला. "कुहूss कुहूsss" कोकिळाच्या आवाजाची डोअरबेल वाजली तेव्हा चैतू तिच्या काव्यमय सुखस्वप्नातून बाहेर आली. "आला वाटतं वसंत..." असं स्वतःशीच म्हणत ती दार उघडायला पळाली. दार उघडताच वसंताला पहिलं दर्शन कुणाचं व्हावं तर ते चैतूचंच, असा आता बऱ्याच वर्षांचा रिवाज पडला होता. "काय म्हणतेय माझी चैत्रपालवी?" दरवाजात आपल्या हृदयस्वामिनीला पाहून वसंतानं लडिवाळपणे विचारलं. त्याचा नेहमीचा प्रश्न ऐकून चैतू मनापासून लाजली. त्याच्याखेरीज कुणीच तिचं संपूर्ण नाव घेत नसे. 'चैत्रपालवी' हे तिचं घसघशीत नाव फक्त शाळा-कॉलेजच्या दाखल्यांत सीमित होऊन राहिलं होतं - बाहेरच्या, खऱ्या जगासाठी ती केवळ 'चैतू' होती. अपवाद फक्त तिच्या नि वसंताच्या या प्रेमभऱ्या दुनियेचा... ही दुनिया फक्त त्या दोघांची होती; दोघांसाठी होती; दोघांपुरती होती. आणि वसंतानं तिचं असं पूर्ण नाव घेणं हा जणू त्यांच्या त्या सुखमयी दुनियेत प्रवेशण्याचा परवलीचा शब्द होता. "तिळा उघड" म्हटलं की नाही ती अलिबाबाची गुहा उघडायची? "राणीसाहेब, दारातच उभं ठेवणार आहात, की घरातही घेणार आहात?" वसंता खट्याळपणे म्हणाला, तेव्हा ती पुन्हा लाजली. अंग आक्रसून घेत एका बाजूला झाली. पण थेट आत येण्याऐवजी वसंतानं हातातल्या बॅगा खाली ठेवल्या आणि दोन्ही हातांनी तिला आपल्या बाहुपाशात ओढलं. विरह आणि प्रतीक्षेमुळं प्रेम वाढतं म्हणतात, ते खरं असावं. इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या प्रियतमाच्या मिठीत विरघळून जाण्याचं सुख चैतू अनुभवू लागली. त्याचीही अवस्था काही निराळी नव्हती, हे त्याच्या आलिंगनातील जोरानं तिला जाणवलं. हृदयात खूप ऊब जाणवली तिला या विचारानं. तिनंही त्याच्याभोवती तिचा प्रेमपाश आवळला. त्या दोन विरही प्रेमजीवांचे आतुर अधर एकरूप होण्यासाठी आसुसलेले असतानाच त्यांना कुणाचा तरी पदरव जाणवला. अनिच्छेनं... मोठ्या कष्टानं ते परस्परांपासून विलग झाले. "आई!" वसंत उद्गारला. गोरीमोरी होत चैतू दूर सरकली आणि चेहऱ्यावरचे भाव लपवण्यासाठी तिनं पटकन वाकून वसंताच्या बॅगा उचलल्या. सासूबाईंकडे न पाहता ती चटकन आत पळाली. राधक्का छानसं हसल्या. वसंत पुढं झाला आणि त्यानं वाकून त्यांचे पाय स्पर्शले. "आयुष्यमान भव!" असा आशीर्वाद देत त्यांनी वसंताच्या खांद्याला धरून उठवलं आणि हृदयाशी घेतलं. कित्येक महिन्यांपासून या माऊलीची ममता आपल्या लेकराला डोळे भरून पाहण्यासाठी व्याकुळलेली होती. आपोआपच त्यांचं प्रेम डोळ्यांतून पाझरून त्यांना बिलगलेल्या वसंताच्या डोक्यावर मूकपणे अभिषेक करू लागलं. "या वेळी आलास ना बाळा चांगली मोठी सुटी काढून?" त्यांनी नेहमीचाच प्रश्न विचारला आणि वसंतानं नेहमीसारखाच तो हसून टाळला. "चल, अगोदर पटकन हात-पाय-तोंड धुवून घे; मी लगेच जेवायला वाढते..." असं म्हणत राधक्का लगबगीनं किचनकडं वळल्या. 'तू नकोस तसदी घेऊ, चैतू बघेल ना स्वैपाकाचं,' असं अगदी जिभेवर आलं वसंताच्या, पण तो बोलला नाही. वयोमानानं थकल्या असल्या, तरी आपल्या पोटच्या गोळ्याला दोन घास स्वतः शिजवून खाऊ घालण्यात आपल्या आईला किती सुख-संतोष आहे, हे वसंत जाणून होता. तिचं ते हक्काचं सुख का हिरावून घ्या? त्याच्या स्वागताची चैतूनंही जय्यत तयारी केलेली होती. डायनिंग टेबलावरचा सरंजाम पाहूनच वसंताची छाती दडपून गेली. पण तो चवीनं प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेऊ लागला. तो जेवत थोडाच होता? तो तर त्या दोघींचं त्याच्यावरचं अपरंपार प्रेम चाखत होता. त्याचं पोट तर त्या दोघींच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहूनच भरलं होतं. त्या दोघींच्या चेहऱ्यावर खरा वसंत फुललेला होता. "वसंता," राधक्का कातर आवाजात म्हणाल्या, "बेटा, मला तुझा फार, फार अभिमान आहे.... आज हे असते, तर ह्यांनाही तुझा अभिमान वाटला असता. राणे घराण्याचं नाव राखलंस, वसंता. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती." वसंतानं भिंतीकडे पाहिलं. त्याचे वडिल खरोखर आनंदी आहेत आणि फोटोतून त्याला आशीर्वाद देताहेत, असं त्याला वाटलं. त्यानं हात जोडले. मेजर जयदीप राणे! पूर्ण गणवेशातील त्यांचा फोटो त्याच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला होता. दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हिरावलं गेलं असलं, तरी त्यांचे फोटो, त्यांचा युनिफॉर्म, त्यांचे मेडल्स पाहून, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शौर्याच्या कहाण्या राधक्कांच्या तोंडून ऐकून त्यानं शाळकरी वयातच निश्चय केला होता - बाबांसारखंच आपणही सैन्यात भरती व्हायचं, देशाची सेवा करायची, ध्वज उंच करायचा आणि आपल्या बाबांचा पुत्र असल्याची स्वतःची लायकी सिद्ध करायची! आणि आज आपल्या मातेकडून प्रशंसेचे शब्द ऐकून त्याची मान ताठ झाली... जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं त्याला. पण केवळ दोनच महिन्यांपूर्वी स्थिती निराळी होती. त्याला आठवले ते कमजोर क्षण... मनाला कमकुवत करणारे ते विचार... आपला निर्धार क्षीण करणारी मोहाची ती घटिका! दोन महिन्यांपूर्वी - हो, दोनच तर महिन्यांपूर्वी... पण आता किती दूरचा भूतकाळ वाटतोय तो! सीमेवरची, आता नेहमीचीच झालेली, फुटकळ चकमक पाहता पाहता मोठ्या धुमश्चक्रीत केव्हा परिवर्तीत झाली, ते कुणालाच कळलं नव्हतं. ते फक्त घुसखोर नव्हते - त्यांच्यामागे उभं राहून त्या नतद्रष्ट शेजारी देशाचं सैन्य जणू भारताला शह देत होतं. साध्या गावठी उखळी तोफा कुठं आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक बूमर्स कुठं! आणि ती परीक्षेची घटिका अशीच अवचित आली. वसंताच्या खांद्याला खांदा लावून लढणारा त्याचा सहकारी, नव्हे, त्याचा मित्र, अचानक कोसळला आणि वसंताचं लक्ष एक क्षण शत्रूवरून विचलित झालं. त्याच्या हातातली मशीनगन क्षणभर शांत झाली आणि त्याचा फायदा घेत शत्रूनं त्यांच्या दिशेनं एक घातक बॉम्ब फेकला. तो वसंतापासून केवळ सहा यार्डांवर फुटला आणि धूर व धुळीच्या ढगाखाली दोघेही दिसेनासे झाले. धुराच्या त्या लोटामध्ये वसंतानं आपल्या जिवलग साथीदाराकडे पाहिलं - वर्मी लागलेली गोळी दिनेशची प्राणज्योत कायमची मालवून गेली होती. वसंत कोलमडला, तो हा क्षण! सैन्यात असला, तरी मृत्यूला त्यानं प्रथम इतक्या जवळून पाहिलं, इतक्या निकट अनुभवलं, तोच हा क्षण! निमिषार्धासाठी आकाशात विद्युल्लता चमकावी आणि सारं क्षेत्र उजळून निघावं, तसं एका क्षणभरातच कित्येक विचार येऊन गेले, कित्येक प्रतिमा चमकून गेल्या. त्याला स्मरलं - दिनेश नुकताच एका लहानग्या बाळाचा पिता बनला होता. पुढल्या महिन्यात मोठी रजा टाकून गावी जायचं स्वप्न पाहत होता. तिकडे कितीतरी नेत्र डोळ्यांचे काजवे करून त्याची वाट पाहत होते - त्याच्या चिमुकलीचे पिटुकले नेत्र, त्याच्या प्राणप्रियेचे वाटेवर अंथरलेले नेत्र, त्याच्या वृद्ध आईवडिलांचे प्रतिक्षेत दमून गेलेले नेत्र! आणि त्या नेत्रांना आता दिसणार होतं ते केवळ त्यांच्या लाडक्याचं तिरंग्यात लपेटलेलं कलेवर. क्षणार्धात वसंताच्या मस्तकात तिडीक उठली. माणसाचं रक्त पिणाऱ्या, जिवलगांची ताटातूट करवून आणणाऱ्या या निरर्थक, निर्बुद्ध लढाया करायच्याच कशाला? आपल्या माघारी आपल्या चैतूचं, आपल्या आईचं काय होईल? उद्या आपला देह चंदनी पेटीतून त्यांच्यासमोर गेला, तर त्या दोघी हा धक्का कसा पचवू शकतील? त्यापेक्षा... त्यापेक्षा या धुराचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन पळून जावं का? घरी मोलमजुरी करू, कारकुनी करू - पण रोज सायंकाळी आपल्याला आपल्या परिवाराचे चेहरे पाहायला मिळतील आणि त्यांना आपला चेहरा बघता येईल. यापेक्षा आणखी सुख ते काय? जावं? जावं? धूर खाली बसू लागला होता, आणि त्यासोबत त्याच्या मनात उठलेला धुरळाही थंडावू लागला. त्याला दिसले फोटोतून त्याच्यावर नजर ठेवून असणारे करड्या शिस्तीचे त्याचे बाबा. ते काय म्हणतील? पळपुटा... भ्याड... कुलकलंक? त्याला दिसली त्याची आई. तिला काय वाटेल? रणांगणातून पळ काढणारा नामर्द जन्माला घालून कूस धन्य होईल का तिची? ‘आईच्या पदराआड लपायचं तुझं आता वय राहिलं नाही,’ असे खडे बोल सुनावेल का ती? आणि त्याला दिसली त्याची चैत्रपालवी. ज्या शूर जवानावर तिनं आपली जवानी कुर्बान केली होती, तिला शोधत बसेल का ती आपल्या पराभूत नजरेत? ज्याच्या हातात तिनं मोठ्या विश्वासानं स्वतःचा हात दिला होता, त्याच्या पळपुट्या पायांचीही साथ देईल का ती? घरी पोचल्यावर अभिमानी नजरेच्या पंचारत्या ओवाळणारी चैतूची मान असल्या भेकड नवऱ्यामुळं कायमचीच खाली जाईल, त्याचं काय? एव्हाना धुरळा पूर्णपणे खाली बसला होता आणि सारं काही त्याच्या नजरेसमोर स्वच्छ दिसू लागलं होतं... मग पुढं काय घडलं, ते त्यालाही नीटसं आठवत नव्हतं. त्याला आठवलं ते एवढंच - धुमश्चक्री थांबलेली आहे; स्फोटकांच्या दारूची काळसर करडी भुकटी, धूळ आणि रक्त यांनी माखलेला वसंत उभा आहे; त्याचे कमांडिंग ऑफिसर फोनवर राधक्काशी बोलताहेत; वसंत अजूनही मनानं बधीर आहे; त्याला फक्त एवढंच ऐकू येतंय, "मौसी, तुझा पोरगा अभिमन्यू आहे. एकटा शत्रूच्या गोटात वाघासारखा शिरला अन् खात्मा केला त्यांचा. भारतमातेचं नाव राखलं त्यानं... आणि मेजर राणेसाहेबांचंही!" आज हे धूसरसं आठवत त्याची नजरही धूसर झाली... त्याच्या डोळ्यांत अश्रू जमू लागले होते. चैतूनं त्याचे अश्रू ओघळण्याआधी त्याच्या डोळ्यांतूनच चुंबून घेतले, तेव्हा त्याला पुन्हा तेच जाणवलं, ज्याचा त्या दिवशी त्याला साक्षात्कार झाला होता - राधक्काची ममता आणि चैतूचं प्रेम हे त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं, त्याची कमजोरी नव्हे. त्या दोघी त्याची शक्ती होत्या, त्याचा दुबळेपणा नव्हे. प्रेम क्षीण बनवत नाही; ते बळ देतं! हे पुन्हा आठवून त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित उमललं. ते पाहून चैतू हसून म्हणाली, "वसंत फुलला, बाई, माझा वसंत खुलला..."
No comments:
Post a Comment